महाराष्ट्रात AI आयुक्तालयाला मंजुरी 

Google search engine

महाराष्ट्रात AI आयुक्तालयाला मंजुरी 

 

आता महाराष्ट्र बनणार आंतरराष्ट्रीय AI टेक्नॉलॉजी हब? 

 

कोकण वार्ता वृत्तसेवा 

 

महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आयुक्तालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सुमारे ₹133.35 कोटी वार्षिक खर्च देखील मंजूर केला आहे. या निर्णयानंतर AI आधारित धोरण तयार होणार आहे. टप्प्या टप्प्याने राज्यातील शासकीय सेवांमध्ये ऑटोमेशन आणि स्मार्ट सिस्टम्स लागू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा घडणार आहे. सरकारी कार्यालय म्हटलं की आपल्यासमोर दिसतो फाईल्सचा भलामोठा ढीग आणि तारखांवर तारखा. पण AI आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे प्रशासनाची प्रतिमा देखील बदलणार आहे. प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे. मानवी चुका टाळून जास्तीत जास्त अचूक काम होणार आहे. 

 

या निर्णयाचा दुसरा मोठा परिणाम म्हणजे स्टार्टअप्स आणि टेक कंपन्यांना मिळणारे प्रोत्साहन. राज्य सरकारकडून डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फंडिंग सपोर्ट आणि पॉलिसी लेव्हलवर मदत मिळाल्यास नवीन आयडिया आणि इनोव्हेशनला चालना मिळेल. विशेषतः AI डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांसाठी महाराष्ट्र एक मजबूत हब बनू शकतो.

 

डेटा मॅनेजमेंट आणि सायबर सुरक्षा हा या AI क्रांतीचा कणा असणार आहे. नागरिकांचा डेटा डिजिटल स्वरूपात येणार असल्यामुळे त्याची सुरक्षितता आणि गोपनीयता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सरकारकडून मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणा उभारण्यावरही भर दिला जाणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो युवकांना. IT आणि टेक क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांसाठी नवीन नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील. फक्त नोकऱ्याच नाही तर तरुणांना उद्योगांच्या नव्या संधीही निर्माण होतील. सरकारी सपोर्टमुळे स्टार्टअप इकोसिस्टम अधिकाधिक सक्षम होईल आणि स्थानिक टॅलेंटला जागतिक स्तरावर काम करण्याची संधी मिळेल.

 

    मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये आधीच मजबूत असलेली टेक इकोसिस्टम या निर्णयामुळे आणखी वेगाने वाढू शकते. नवीन टेक पार्क्स, इनोव्हेशन सेंटर्स आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स यामुळे ही शहरे AI आणि डिजिटल इनोव्हेशनचे केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जातील. एकूणच हा निर्णय महाराष्ट्राला केवळ डिजिटल बनवणार नाही महाराष्ट्राची AI आणि टेक्नॉलॉजी हब म्हणून जागतिक ओळख निर्माण करणार आहे.