बागायतदारांच्या नुकसानभरपाईसाठी अटी शिथिल करा!
सिंधुदुर्ग आंबा-काजू बागायतदार महासंघाचे तहसीलदारांना निवेदन
देवगड: प्रशांत वाडेकर
आंबा व काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनाकडून अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेतील जाचक अटींमुळे अनेक बागायतदार मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या अटी शिथिल कराव्यात आणि अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, या मागणीचे निवेदन ‘सिंधुदुर्ग आंबा-काजू बागायतदार व व्यापारी महासंघा’च्या वतीने देवगड तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी आंबा बागायतदार प्रशांत शिंदे, आप्पा अनभवणे, प्रसाद मोंडकर, गणेश वाळके. निलेश पेडणेकर,विकास दिक्षित आदी उपस्थित होते.
सध्या नुकसानभरपाईसाठी अर्ज करताना ई-पीक पाहणी आणि ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) यांसारख्या तांत्रिक बाबींची सक्ती केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी तांत्रिक कारणांमुळे झालेली नाही, तर अनेकांचे फार्मर आयडी अद्याप तयार नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अर्ज करणे कठीण झाले आहे.
या निवेदनाद्वारे महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद उर्फ काका ढोके यांनी खालील मागण्या केल्या आहेत: १. नुकसानभरपाईच्या अर्जासाठी असलेल्या कडक अटी शिथिल कराव्यात. २ अर्ज सादर करण्यासाठी बागायतदारांना वाढीव मुदत देण्यात यावी. ३. ज्यांची ई-पीक पाहणी झालेली नाही, त्यांची नोंद तलाठीमार्फत हस्ते (Manual) करून घ्यावी. ४. फार्मर आयडीची अट तात्पुरती शिथिल करून अर्ज स्वीकारले जावेत.
बागायतदारांवरील नैसर्गिक संकट पाहता, प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि सरसकट सर्व पात्र बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी विनंती महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.


