मिठबांव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची एस . टी. बस अभावी गैरसोय
फेऱ्या पूर्ववत करण्याची रामेश्वर हायस्कूलची मागणी
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील मिठबांव हायस्कूलमध्ये कातवण, दहिबांव, बागमळा या ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, गेल्या काही काळापासून एस.टी. बसच्या फेऱ्या अनियमित झाल्याने आणि काही फेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मिठबांव रामेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी देवगड आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन देऊन बस फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्याची आणि बंद गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
यावेळी मिठबावचे सुपुत्र व पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके, क्षा. म. स. शिक्षण संस्था, मिठबांव चे सहा. कार्यकारी अधिकारी (प्रशासन) एम. के. लोके, मुख्याध्यापक आर.आर. राऊत, शिक्षक आर. व्ही. फणसेकर, एस एस पवार, शिक्षकेत्तर कर्मचारी अतुल मेस्त्री उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सायंकाळी शाळे सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी सध्या देवगड-तांबळडेग ही बस सायंकाळी ५:४५ ते ६:०० च्या दरम्यान उपलब्ध होते. यामुळे विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रात्र होत असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. ही गाडी जर मिठबांव येथे सायंकाळी ४:४० वाजेपर्यंत आल्यास विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.
तसेच, यापूर्वी सुरू असलेली देवगड-मिठबांव-फोंडा ही बस सकाळी ९:३० वाजता आणि सायंकाळी ४:४५ वाजता मिठबांव येथे येत होती. ही महत्त्वाची फेरी सध्या बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल होत आहेत. ही गाडी पूर्वीप्रमाणेच सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच दुपारी ३:३० वाजता देवगड येथून सुटणारी देवगड-कुणकेश्वर बस मिठबांव-दहिबांवपर्यंत वाढवण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल.
या संदर्भात शाळेने यापूर्वीही दि. १ जुलै २०२५ रोजी पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या रास्त मागणीचा गांभीर्याने विचार करून बस फेऱ्यांचे नियोजन त्वरित करावे, अशी मागणी मिठबांव हायस्कूल आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


