आता भांडवली मूल्यावर होणार मालमत्ता कर आकारणी 

Google search engine

आता भांडवली मूल्यावर होणार मालमत्ता कर आकारणी 

सांडपाणी सोडल्यास होणार १ ते ५ हजाराचा  दंड

नाम फाउंडेशन वतीने अन्नपूर्णा नदीतील गाळ उपसा 

शहरवासीयांना दोन दिवस आड पाणी पुरवठाचे नियोजन 

देवगड-जामसंडे नगरपंचायत सर्वसाधारण सभा

 

देवगड:: प्रशांत वाडेकर 

देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामध्ये मालमत्ता कराची नवीन पद्धत, सांडपाणी व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा नियोजनाचा समावेश आहे.

नगरपंचायत आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या धर्तीवर कर आकारणी करत होती, मात्र यापुढे मालमत्तांचे कर निर्धारण भांडवली मूल्यावर (Capital Value) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, शहरात स्वच्छतेचे नियम कडक करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी सांडपाणी सोडल्यास ५ हजार रुपये आणि खाजगी जागेत सांडपाणी सोडल्यास १ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. याशिवाय, मैला उपसा वाहनाचे (सक्शन व्हॅन) दर १२०० रुपयांवरून १५०० रुपये करण्यात आले आहेत.

शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी शिरगाव-पाडाघर योजनेतून ६ लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. १ मे पासून नाम फाउंडेशनच्या सहकार्याने दहिबांव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी दहिबांव योजनेचे ट्रेंच गॅलरीचे काम पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली, जेणेकरून सद्यस्थितीत नागरिकांचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही.

जनगणना आणि नागरी सुविधा

प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांनी सांगितले की, १ मे पासून स्वयं जनगणना आणि १६ मे पासून घरोघरी जाऊन जनगणना केली जाईल. तसेच, नगरपंचायतीच्या ६५ विविध सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी २८ तारखेला ‘सेवा दिन’ साजरा केला जाणार आहे.

सहकारनगर होणार स्वामी समर्थ नगर 

उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी एसटी स्टँड समोर ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह’ असा दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली. तर, नगरसेविका आद्या गुमास्ते यांनी अपघातप्रवण क्षेत्रातील अनधिकृत बॅनरवर कारवाई होत नसल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. जामसंडे सहकार नगरचे स्वामी समर्थ नगर असे नामकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी मान्य करण्यात आली.

या सभेला मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक संतोष तारी, शरद टूकरूल, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकर, नगरसेविका आद्या गुमास्ते, रुचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर आणि प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे उपस्थित होते.