गॅस कनेक्शनच्या ‘व्हॉट्सॲप मेसेज’मुळे बसला ८ लाखांचा फटका!

Google search engine

गॅस कनेक्शनच्या ‘व्हॉट्सॲप मेसेज’मुळे बसला ८ लाखांचा फटका!

देवगड-जामसंडे येथील घटना

 

देवगड/ प्रतिनिधी

अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामसंडे परिसरातील पीडित व्यक्तीने याबाबत देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ एप्रिल सकाळी ९:३० ते १० वाजण्याच्या कालावधीत घडली.

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दादर- माहीम येथे स्वमालकीची एक घर आहे. हे घर त्यांनी भाड्याने दिले असून त्या घरासाठी पीडित व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन कार्यान्वित आहे. या गॅस कनेक्शनबाबत पीडित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरील व्हाट्सअपवर *दादर महानगर* गॅसचा लोगो असलेली एपीके फाइल एका अनोळखी नंबरवरून आली. या एपीके फाइल्सच्या माध्यमातून *महानगर गॅस बिल अपडेट्स* अशी सूचना करण्यात आली होती. त्यामुळे पीडित व्यक्तीने ही फाइल्स आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली व त्यानंतर त्या एप्लिकेशन्स वर पीडित व्यक्तीने बँक ऑफ इंडियाच्या आपल्या खात्याच्या डेबिटकार्ड वरील सर्व माहिती भरली.त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपये अज्ञात संशयीताने ऑनलाईन पद्धतीने काढून घेत पीडित व्यक्तीला गंडा घातला. याबाबत पीडित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (बी), ३१८ (4), ३१६ (३), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ६६(सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक श्याम बुवा करीत आहेत.