वाडा-कसबेवाडी येथे १६ वर्षीय मुलीची गळफास लावून आत्महत्या
देवगड | प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील वाडा कसबेवाडी येथील एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निशा शरद मेस्त्री असे मृत मुलीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना सोमवार, २३ मार्च रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. निशा घरात एकटी असताना तिने एका खोलीतील लाकडी वाशाला पांढऱ्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दुपारी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना माहिती दिली, त्यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली.
सुसाईड नोट जप्त
आत्महत्येपूर्वी निशाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. “आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,” असे तिने या चिठ्ठीत नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलीचे वडील शरद मोहन मेस्त्री (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
निशाचे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते. तिचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर तिची भावंडे सध्या शिक्षण घेत आहेत. एका तरुण मुलीने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने वाडा परिसरात शोककळा पसरली आहे.


