जामसंडे येथील वॉटर एटीएम कामाची चौकशी करा
चंद्रकांत कावले यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
देवगड:/प्रतिनिधी
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत जामसंडे पिक-अप रोड परिसरात करण्यात आलेले वॉटर एटीएमचे काम अनधिकृत जागेवर झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर वॉटर एटीएमचे काम करताना शासनाच्या मंजूर अटी व शर्तींचे पालन करण्यात आलेले नाही. हे काम अनधिकृत जागेवर करण्यात आल्यामुळे शासन निधीचा गैरवापर आणि कामात अनियमितता झाल्याची गंभीर शंका निर्माण होत आहे.

तरी प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. तसेच अनधिकृत जागेवर काम करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यावर योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कावले यांनी केली आहे. या तक्रारीमुळे जामसंडे परिसरातील वॉटर एटीएमच्या कामाबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.


