कोटकामते येथे अवैध मृदा उत्खननावर देवगड तहसीलदार यांची धडक कारवाई*
देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील कोटकामते गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध मृदा (माती) उत्खननाविरोधात ग्रामस्थ व कोटकामते ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत देवगड तहसीलदार यांनी धडक कारवाई केली.
या कारवाईदरम्यान उत्खनन होत असलेल्या ठिकाणी देवगड तहसीलदार यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मा. पावसकर साहेब तसेच खुडी येथील तलाठी श्री. वंजारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला. यावेळी एमएच-07 AJ 8888 क्रमांकाचा माती वाहतूक करणारा डंपर चालकासह आढळून आला. तसेच त्या ठिकाणी झालेल्या खोदकामाचे मोजमाप घेऊन आणि उत्खननासाठी वापरण्यात आलेली विविध हत्यारे यांची नोंद करण्यात आली.
सदर पंचनामा व अहवाल पुढील कार्यवाहीसाठी देवगड तहसीलदार मा. आर. जे. पवार साहेब यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या कारवाईच्या वेळी गावचे उपसरपंच मा. गणेश (दाजी) घाडी, माजी उपसरपंच मा. विजय केशव कुडपकर तसेच ग्रामस्थ भालचंद्र (भाई) मेस्त्री हेही उपस्थित होते.
गाव परिसरात विनापरवाना मृदा उत्खनन सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत देवगड तहसीलदार यांनी तात्काळ हालचाल करत छापा टाकून माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली.
या कारवाईमुळे अवैध माती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, ग्रामस्थांनी अशा प्रकारच्या अवैध उत्खननावर कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.


