शिरगांव येथे शनिवारी छ्त्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर
शिरगांव : (कोकण वार्ता)
: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत तहसिल कार्यालय देवगडच्यावतीने महसूल मंडळ शिरगांव येथे शनिवार ७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात महसूल विभागाशी संबंधित १४ सेवांचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने प्रलंबीत फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवाशी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक (NA) तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नविन व्यवस्थापननुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यासाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ऍग्रीटॅग आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे महसूल प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

