आंबा बागायतदारांना अर्थसंकल्पातून द्या मदतीचा हात

Google search engine

 

आंबा बागायतदारांना अर्थसंकल्पातून द्या मदतीचा हात

राजू शेट्टी यांची फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्याकडे मागणी

 

मुंबई / प्रतिनिधी 
कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला असून राज्य सरकारने तातडीने या शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती व हेक्टरी ५ लाख रूपये मदतीचा हात येत्या बजेटच्या अर्थसंकल्पात देवून इतर उपाययोजना करण्याची मागणी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी प्रतिनिधी यांचेसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचेकडे केली.

चालू वर्षीचा आंबा हंगाम मोहोर गळती , अवकाळी पाऊस, तापमानातील चढ उतार , फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता किटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन , कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ मधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र राज्यातील कृषी , फलोत्पादन , मत्स्य विभागाने सर्व उपाययोजना कागदावर केलेल्या आहेत.

बदलत्या हवामानामुळे तुडतुडे , फळमाशी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला असून, देवगड आणि इतर भागात मोहोर करपल्याने उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

आंबा बागायतदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी किंवा हेक्टरी ५ लाख रूपयाची नुकसानभरपाई देण्यात यावी.खते , किटकनाशके ,बुरशीनाशके औषध कंपन्यांनी बोगस औषधे , खते व किटकनाशके यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला असून आंबा उत्पादक शेतक-यांची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे कृषी विभागामार्फत संपुर्ण चौकशी करण्यात यावी व संबंधित कंपन्यावर कारवाई करण्यात यावी.देवगड याठिकाणी अद्यावत आंबा संशोधन केंद्र उभारून AI तंत्रज्ञानाव्दारे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

वरील मागण्याबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने १२ मार्च रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री गोगावले यांना दिली.