आंबा बागायतदार व व्यापारी यांचा १८ रोजी भव्य मेळावा

0
Google search engine

शेतकरी नेते राजू शेट्टी राहणार उपस्थित

 

देवगड : प्रशांत वाडेकर

आंबा बागायतदारांच्या समस्यांनी आता उग्र रूप धारण केले असून बागायतदारांच्या हक्कासाठी आणि योग्य न्यायासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वा जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे आंबा बागायतदार व व्यापारी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, खतांच्या वाढत्या किमती आणि बाजारपेठेतील दराची अनिश्चितता यामुळे कोकणचा हापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. आंबा बागायतदारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता थेट संघर्षाची भूमिका घेण्यात आली आहे. “ही फक्त उपस्थिती नाही, तर सत्तेला धडकी भरवणारी चेतावणी आहे,” अशा कडक शब्दांत बागायतदारांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.

आंबा बागायतदारांना घामाचे दाम आणि योग्य बाजारभाव मिळवून देणे. ​व्यापारी आणि बागायतदार यांच्यातील समन्वयातून शेतकऱ्यांचे हित जोपासणे.
​शासकीय पातळीवर आंबा पिकाला मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेणे या प्रमुख मागण्यांची मेळाव्यात चर्चा होणार आहे.

​शेतकऱ्यांचे बुलंद नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी स्वतः मैदानात उतरणार असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. “शेतकऱ्यांचा आवाज आता दिल्ली-मुंबईपर्यंत घुमणार आहे. आंबा बागायतदार आता गप्प बसणार नाही,” असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

​”आज गैरहजर राहिलात, तर उद्याचा अन्याय कायम राहील,” असे आवाहन करत देवगडसह जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदारांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवगड तालुका आंबा बागायतदार व व्यापारी संघाकडून करण्यात आले आहे.