​दक्षिण कोकणची काशी ‘कुणकेश्वर’ महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज!

0
Google search engine

 

​१५ ते १७ फेब्रुवारीला भरणार भक्तीचा महाकुंभ

​देवगड /प्रतिनिधी

‘हर हर महादेव’च्या जयघोषात आणि अरबी समुद्राच्या लाटांच्या साक्षीनं साजरा होणारा दक्षिण कोकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वरचा महाशिवरात्री यात्रोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या १५ ते १७ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत हा सोहळा रंगणार असून, यावर्षी लाखो भाविकांची ‘रेकॉर्डब्रेक’ गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, गाभारा आणि संपूर्ण कुणकेश्वर नगरी विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाली आहे.

यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी गुरुवारी कुणकेश्वरला भेट देऊन मंदिर व यात्रा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली व सरपंच महेश ताम्हणकर यांच्याकडून त्यांनी नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. भाविकांच्या सुरक्षेसाठी परिसरात ठिकठिकाणी उंच वॉच टॉवर उभारले जाणार असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

​भक्तांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना:
​शिस्तबद्ध दर्शनरांगा: भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी भक्तनिवासपासून बॅरिकेड्स लावून रांगांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
​हिरकणी कक्ष: महिला भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विशेष ‘हिरकणी कक्षा’ची निर्मिती करण्यात आली आहे.
​शुद्ध पेयजल: यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून ठिकठिकाणी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे.
​एस.टी.ची जादा सोय: भाविकांच्या सोयीसाठी देवगड, कणकवली, मालवण आणि विजयदुर्ग आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

​व्यापाऱ्यांची आठवडाभर आधीच लगबग

यात्रेचे आकर्षण असलेल्या बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांनी आठवडाभर आधीच आपली दुकाने थाटली आहेत. खेळणी, घरगुती वस्तू आणि खाऊच्या दुकानांनी परिसर गजबजला आहे. दरम्यान, यात्रेसाठी येणाऱ्या विविध देवस्वाऱ्यांनी आपल्या आगमनाची पूर्वसूचना देवस्थान ट्रस्टला द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

​व्हीआयपी व मुखदर्शन व्यवस्था

गर्दीचा विचार करता दर्शनासाठी स्वतंत्र ‘व्हीआयपी’ रांग ठेवण्यात आली आहे, ज्यातून भाविकांना ‘मुखदर्शन’ घेता येणार आहे. आरोग्य विभाग, महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत यंत्रणाही भाविकांच्या सेवेसाठी २४ तास सज्ज राहणार आहे.

​”कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि सर्व शासकीय विभाग भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून दर्शनाचा लाभ घ्यावा.”
एकनाथ तेली (अध्यक्ष, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट)