भाजी घ्या भाजी, ताजी ताजी रान भाजी!
खुडी शाळेत रान भाजी महोत्सव…
देवगड/ प्रतिनिधी
‘ भाजी घ्या भाजी, ताजी ताजी रान भाजी, फोडशी, कुर्डू,अळू, शेवग्याचा पाला,पेवा, भारंगी,टाकळा,सुरण, कुड्याच्या शेंगा,फागली,10 रुपयाला 2 जुड्या,,२० ला ४ जुड्या …. अशा असंख्य आरोळ्यांनी शनिवारच्या सकाळी खुडी शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले होते. निमित्त होतं रानभाजी महोत्सवाचे. त्यानिमित्ताने रानभाजी प्रदर्शन व विक्री . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खुडी गावातील खुडी नं १ या शाळेच्या वतीने शनिवार दि.१८ रोजी ‘ रानभाजी महोत्सवाचे’आयोजन करण्यात आले होते.
मुलांनी परिसरातील उपलब्ध विविध पालेभाज्या, रानभाज्या, गावठी भाज्या,इ.विकण्यासाठी दुकाने मांडली होती. खुडी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रानभाज्यांची मुलांकडून खरेदी केली. आपली भाजी विकण्यासाठी मुलांची चाललेली धडपड पाहण्यासारखी होती. यातून मुलांना व्यवहारातील विविध संकल्पनांची ओळख होण्यास मदत झाली तसेच सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या ,अपरिचित रान भाज्या, रानभाज्यांचे पौष्टिक मूल्य व महत्त्व,कमीत कमी खर्चात उपलब्धता यांची विद्यार्थ्यांना माहिती मिळाली.
सदर महोत्सवाला कुणकेश्वर विभाग जि.प.सदस्य सुनिल भाई पारकर व मुणगे गण पं. स. सदस्य सदाशिव ओगले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
खुडीचे सरपंच श्पक कदम, उपसरपंच शशिकांत कावले, मिठबाव प्रभाग विस्तार अधिकारी सौ. प्रणाली मराठे, कोटकामते केंद्रप्रमुख सौ.कालिंदी माणगावकर,
शा.व्य.समिती अध्यक्ष सुमित जोईल, शा.व्य. समिती उपाध्यक्षा सौ. प्रेरणा घाडी मॅडम व सर्व शा.व्य. समिती सदस्य, पोलीस पाटील सौ.मृण्मयी आरेकर मॅडम,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनंत वायंगणकर, मंगेश आरेकर, श्री. जगदाळे, श्री.कवर , अंगणवाडी सेविका सौ.धुरी,सौ.पाडावे, सौ.गुळेकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
खुडी ग्रा.पं.सदस्य,खुडी ग्रामस्थ व शाळेचे माजी विद्यार्थी यांनी महोत्सवास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व खरेदी केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनिता दुखंडे, पदवीधर शिक्षिका सौ.स्मिता कदम,पदवीधर शिक्षक योगेश पाटील सर,सहाय्यक शिक्षक. विजय माने यांनी उत्कृष्ट नियोजन केले.शाळा व्यवस्थापन समिती खुडी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


