अणुऊर्जा प्रकल्प, आंबा नुकसान भरपाई, वीज प्रश्नांवर सदस्य आक्रमक

Google search engine

अणुऊर्जा प्रकल्प, आंबा नुकसान भरपाई, वीज प्रश्नांवर सदस्य आक्रमक

देवगड पंचायत समितीची मासिक सभा

 

देवगड / प्रतिनिधी
मुणगे परिसरात अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या अफवांमुळे गावागावांत भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे . “प्रदूषणकारी कोणत्याही प्रकल्पाला आमचा विरोध असून पालकमंत्री,व आम्ही लोकप्रतिनिधी ग्रामस्थांच्या भूमिकेसोबत ठाम आहोत. मात्र प्रकल्पाच्या आड राहून शासनाला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना आम्ही सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी पंचायत समितीच्या सभेत दिला.

भूमी अभिलेख विभागाचा कारभार, खारलँड विभागाची रखडलेली कामे, महावितरणची कामे, पीकविमा व पीककर्ज यासह विविध विषयांवर सदस्यांनी आक्रमक होत प्रशासनाला प्रश्न विचारले. देवगड पंचायत समितीची मासिक सभा सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात पार पडली. व्यासपीठावर उपसभापती अमोल लोके, गटविकास अधिकारी निलेश जगताप उपस्थित होते. तसेच सदस्य संजना आळवे, रविंद्र तिर्लोटकर, सदाशिव ओगले, सादिक डोंगरकर, अंकुश टूकरूल, समृध्दी चव्हाण, शीतल तावडे, संजना लाड, सलोनी तळवडेकर, स्नेहा अनभवणे उपस्थित होत्या.

अणुऊर्जा प्रकल्पाबाबत बोलताना ओगले म्हणाले, मुणगे येथे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्यात आली. परिसरात करण्यात आलेली बोरवेल ही भूजल पातळी (वॉटर लेव्हल) व साईट टेस्टसाठी केंद्र शासनाच्या नियमित कार्यक्रमाचा भाग असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच अणुऊर्जा प्रकल्पाबाबत प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सभागृहाला सांगितले.

पालकमंत्री नितेश राणे यांनीदेखील ग्रामस्थांचा ज्या प्रकल्पाला विरोध असेल त्या प्रकल्पाला आपलाही विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचे ओगले यांनी सांगितले. या भागात सौरऊर्जेसारखे पर्यावरणपूरक प्रकल्प आणावेत, अशी सूचना करण्यात आली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, काही अदृश्य शक्ती चुकीची माहिती पसरवून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत, अशा प्रकारांना थारा दिला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

खारलँड विभागाच्या कामकाजावर टीका करताना बागमळा-कारळे बंदराचे काम २०२० पासून अपूर्ण असल्याचा तसेच मोंड , बापर्डे येथील कामे २०१८ पासून रखडल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित ठेकेदारांवर तातडीने ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

महावितरण विभागाच्या आढाव्यावेळी सभापती गणेश राणे यांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. झाडांची छाटणी, जीर्ण वीजखांब बदलणे व इतर कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रामेश्वर-कोलवाडी येथील जीर्ण वीजखांब तातडीने बदलावेत, अशी मागणी सदस्य रवींद्र तिर्लोटकर यांनी केली.

मुणगे-आडबंदर येथे उभारण्यात आलेल्या वीजलाइनबाबत आचरा विभागाकडे माहिती नसल्याचा प्रकार दिशाभूल करणारा असल्याची सदस्य सदाशिव ओगले यांनी सांगितले.

लघुपाटबंधारे विभागाच्या आढाव्यात पाणी अडविण्याऐवजी पाणी वाहून जाणारे बंधारे उभारले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शासनाचा निधी खर्च होत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फायदा होईल, असे दर्जेदार व कायमस्वरूपी बंधारे उभारावेत, अशा सूचना ज्येष्ठ सदस्य सदाशिव ओगले व उपसभापती अमोल लोके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

उपसभापती अमोल लोके यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. २० मार्च २०२४ रोजी मिठबाव येथील सर्व्हे क्रमांक ४०२ चा नकाशा मागितल्यानंतर “नकाशा उपलब्ध नाही” असे लेखी उत्तर देण्यात आले होते. मात्र, त्याच नकाश्याची प्रत २०२६ मध्ये उपलब्ध करून देण्यात आली. “शेतकऱ्यांना नकाशा मिळत नाही, पण एजंटांना तो त्वरित मिळतो. मग दोन वर्षांनंतर हा नकाशा अचानक कुठून आला?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

सभेत शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढविणे तसेच १ ऑक्टोबर ते ३० मे या कालावधीसाठी पीकविमा संरक्षण लागू करण्याचा ठराव शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी तालुक्यातील ९,३२७ शेतकऱ्यांसाठी २० कोटी ८२ लाख रुपयांची आंबा व काजू नुकसानभरपाई मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच कृषी विभागात मंजूर ३७ कृषी सहाय्यकांच्या पदांपैकी केवळ २० कर्मचारी कार्यरत असल्याने कामकाजावर मोठा ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले.

*विविध प्रश्नावर सदस्या सलोनी तळवडेकर आक्रमक*

पंचायत समिती सदस्य सौ. सलोनी तळवडेकर यांनी आरे गावात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. तळेबाजार येथील वीज अधिकारी कार्यालयीन वेळेत घरी झोपा काढतात. वीज वितरणाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

*चिरे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करा-* अंकुश टूकरूल

पाटगाव, गोवळ, पेंढरी, रहाटेश्वर, मणचे, मोंड, वाघोटन, सौंदाळे या गावात चिरेखाणी आहेत. या खाणीवरील चिरे कोल्हापूर, बेळगांवला वाहतूक होतात. या गाड्या सुमारे १५ ते १६ टन वाहतूक करतात. आपल्या रस्त्यांचीक्षमता ही केवळ ८ टनची आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत आहे. तसेच गंभीर अपघातात दोन बळी गेले आहेत त्यामुळे या वाहतुकीवर कारवाई व्हावी, अशी मागणी सदस्य अंकुश टूकरूल यांनी केली.

सभेत शिक्षण, आरोग्य, महसूल, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, एसटी आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत देवगड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.