पंतप्रधान आवास योजनेच्या कामावरून नगरसेवक नितीन बांदेकर आक्रमक
देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा ठरली वादळी
ठेकेदारांना विनादंड मुदतवाढीवरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली
देवगड: / प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज विविध विकासकामांच्या मुद्द्यांवरून कमालीची वादळी ठरली. पंतप्रधान आवास योजनेतील कथित गैरव्यवहार आणि निकृष्ट कामावरून उबाठाचे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत थेट ‘पीएमओ’कडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तर दुसरीकडे, नळयोजनेच्या मुदतवाढीवरून सत्ताधारी भाजपच्याच दोन नगरसेवकांमध्ये सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष मिताली सावंत, पाणी पुरवठा सभापती तन्वी चांदोसकर, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होते.
पंतप्रधान आवास योजनेवरून नितीन बांदेकर आक्रमक
सभेच्या सुरुवातीलाच उबाठा पक्षाचे नगरसेवक नितीन बांदेकर यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या मुद्द्यावरून प्रशासनाची कोंडी केली. बांदेकर म्हणाले की, “पंतप्रधान आवास योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. खंडेलवार समितीच्या दुसऱ्या अहवालातही ठेकेदारावर मोठा दंड आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. असे असतानाही ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई न करता काम का सुरू ठेवण्यात आले आहे? प्रशासन यावर शांत का बसले आहे?”
तर लाभार्थ्यांचे पैसे व्याजासह देणार का?
पुढे बोलताना त्यांनी लाभार्थी निवडीच्या पद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. २४० पैकी १४४ लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार असून यासाठी पारदर्शक लॉटरी पद्धत न वापरता ऑनलाईन पद्धतीने नावे निवडली गेली. तसेच प्रत्येक लाभार्थ्याकडून ५ हजार रुपये घेण्यात आले आहेत, ते पैसे नागरिकांना व्याजासह परत मिळणार का? असा सवाल त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे दाखल करणार असल्याचा इशारा बांदेकर यांनी दिला.
लाभार्थ्यांची फसवणूक
तसेच लाभार्थ्यांना सुरुवातीला साडे सहा लाखात घर देणार असे सांगितले होते. आता १३ लाखाला देणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची फसवणूक सुरू आहे. योजनेतील लाभार्थ्यांना चार वर्षे विश्वासातच घेतलेले नाही १५ टक्के सुद्धा काम नसताना २८ टक्के पेमेंट दिले आहे., असा आरोप करीत आता आम्ही गप्प बसणार नाही, असा बांदेकर यांनी इशारा दिला.
नळयोजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच ‘शाब्दिक बाचाबाची
नळयोजनेच्या ठेकेदाराला विना दंड मुदतवाढ देण्याचा विषय सभेसमोर आल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी याला आक्षेप घेत, “मुदतवाढीला विरोध नाही, मात्र ती विना दंड देता येते का? याचा खुलासा प्रशासनाने करावा, जेणेकरून भविष्यात सभागृह अडचणीत येणार नाही,” अशी भूमिका घेतली.
यावर पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी ठेकेदाराची पाठराखण करत, “विना दंड मुदतवाढ देण्याच्या मागणीला माझे समर्थन आहे. उद्या काही अडचण आल्यास त्याला मी जबाबदार राहीन,” असे सांगितले. यावरून दोन्ही सभापतींमध्ये वाद विकोपाला गेला. चांदोसकर यांनी बुवा तारी यांना “सभागृहात हिरोगिरी करू नका,” असे सुनावले, ज्यावर “आम्ही कोणतीही शो-शायनिंग करत नाही आणि आम्हाला त्याची गरजही नाही,” असे प्रत्युत्तर तारी यांनी दिले.
आठवडा बाजार रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी
दरम्यान, देवगड महाडिक घर ते आठवडा बाजार या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा नगरसेविका ॲड. प्रणाली माने यांनी लावून धरला. हा रस्ता अत्यंत खराब झाला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भागात आठवडा बाजार भरत असल्याने येथील खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
वॉटर एटीएम वरून विरोधक आक्रमक
जामसंडे व देवगड येथील वॉटर एटीएम वरून उभाठा नगरसेवक सुधीर तांबे नितीन बांदेकर यांनी शासनाचा पैसा वाया जात आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी केली यावेळी मुख्याधिकारी यांनी दोन्ही एटीएम पुन्हा सुरू केली जातील मात्र जामसंडे येथील एटीएम जागेचा विषय वादग्रस्त आहे संबंधित ठेकेदाराची तीन लाख रुपये अनामत रक्कम आहे. त्या रकमेतून दोन्ही एटीएम दुरुस्त करता येतील सुरुवातीला बालोद्यान एटीएम दुरुस्त केले जाईल असे त्यांनी सांगितले.
प्लास्टिक कचऱ्यावरून खडाजंगी
शहरामध्ये प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात कचरा आहे हा कचरा गोळा करण्यासाठी तीन रुपये प्रति दराने एक एजन्सी कचरा घेण्यास तयार झाली आहे या संदर्भात स्वच्छता सभापती बुवा तारी यांनी सभागृहात माहिती दिली त्यावर विरोधी नगरसेवकाने आक्षेप घेत एजन्सी नेमणूक शासनाचा पैसा पाया घालवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला मात्र मुख्याधिकारी यांनी सदर कचरा प्रशासनाला उचलायचा असेल तर किमान 40 ते 50 लाख रुपये खर्च आहे मात्र एजन्सी मार्फत कचरा उचलला गेला तर दीड लाख रुपये खर्च येईल त्यामुळे शहर स्वच्छ व्हायचं असेल तर हा खर्च करायला हवा असे सांगितले त्यानुसार टेंडर प्रक्रिया करून त्याबाबत एजन्सी नेमणी द्यावी असे ठरले.
यावेळी पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी माझ्या बागेमध्ये ठेवण्यात आलेल्या कचरा उचलण्यात यावा अशी मागणी केली.
या सभेला भाजप गटनेते शरद टूकरूल, नगरसेविका मनिषा जामसंडेकर, स्वरा कावले, आद्या गुमास्ते, नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी, चंद्रकांत कावले, सुधीर तांबे, विशाल मांजरेकर आदी उपस्थित होते.


