योगेश पाटकर यांच्यातर्फे प्रभाग १४ मध्ये रानडे कॉलनी आणि गणेश नगर गार्डन येथे स्वखर्चाने बसविले बेंचेस
देवगड / प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून देवगड जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्र. १४ मधील रानडे कॉलनी आणि गणेश नगर गार्डन येथे नागरिकांना बसण्यासाठी भाजपचे माजी शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांनी स्वखर्चाने आकर्षक व मजबूत बेंचेस बसवले आहेत.
प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना विरंगुळ्याच्या ठिकाणी बसण्यासाठी सोय व्हावी, या हेतूने पाटकर यांनी हा सामाजिक पुढाकार घेतला. रानडे कॉलनी आणि गणेश नगर गार्डन ही नागरिकांच्या वर्दळीची आणि फिरण्याची मुख्य ठिकाणे असल्याने येथे बेंचेसची अत्यंत गरज होती. ही गरज ओळखून नारायणराव राणे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त हे बेंचेस नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
या सामाजिक उपक्रमाबद्दल रानडे कॉलनी आणि गणेश नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून योगेश पाटकर यांच्या या कार्याचे विशेष कौतुक व आभार मानले आहेत.


