पालकमंत्री नितेश राणे यांनी केले योगेश पाटकर यांचे कौतुक

Google search engine

 पालकमंत्री नितेश राणे यांनी केले योगेश पाटकर यांचे कौतुक

*गरीब कुटुंबाला स्वखर्चाने बांधून दिले होते हक्काचे घर!

 

कणकवली:/ प्रतिनिधी 

जामसंडे येथील नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १४ मधील धोपटेवाडी येथे राहणाऱ्या चंद्रकांत धोपटे या गरीब कुटुंबाला स्वतःच्या खर्चाने घर बांधून देत, समाजासमोर एक अनोखा आदर्श निर्माण करणारे भाजपचे माजी देवगड-जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर यांचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.

​पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी योगेश पाटकर यांना कणकवली येथील ‘ओम गणेश’ या आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी पाटकर यांनी केलेल्या या कौतुकास्पद आणि संवेदनशील सामाजिक कार्याची पाठ थोपटली. “समाजातील गरजू घटकांना अशा प्रकारे मदत करून तुम्ही एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. भविष्यातही तुमच्याकडून अशाच प्रकारच्या समाजोपयोगी कामांची अपेक्षा आहे,” अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी पाटकर यांचा गौरव केला.

गरीब आणि गरजू कुटुंबाला हक्काचे छत मिळवून देणाऱ्या योगेश पाटकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, “अशा चांगल्या आणि जनहिताच्या कामांसाठी आमचे सहकार्य नेहमीच लाभेल,” अशी ग्वाही देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.

​योगेश पाटकर यांच्या या दातृत्वामुळे धोपटे कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून, राजकीय क्षेत्रापलीकडे जात त्यांनी केलेल्या या मदतीचे संपूर्ण देवगड-जामसंडे परिसरातून आणि सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे.