कुणकेश्वर ते कोल्हापूर थेट एसटी बस सेवा सुरू करा
कुणकेश्वर ग्रामपंचायत प्रशासक महेश ताम्हणकर यांची परिवहन मंत्र्यांना मागणी
देवगड: प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासकमहेश ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
कुणकेश्वर (ता. देवगड) येथे दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी महाराष्ट्रभरातून, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्याचप्रमाणे देवगड आणि कुणकेश्वर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि रुग्ण हे वैद्यकीय उपचार, व्यापार आणि देवी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने कोल्हापूरला जात असतात.
थेट बस नसल्याने प्रवाशांचे हाल
सध्या कोल्हापूर ते कुणकेश्वर दरम्यान कोणतीही थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना गाड्या बदलत (कनेक्टिंग प्रवास) प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसटी महामंडळाच्या उत्पन्नात होणार वाढ
कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, वैद्यकीय आणि शैक्षणिक केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. जर एसटी महामंडळाने कोल्हापूर-कुणकेश्वर अशी थेट बसफेरी सुरू केली, तर प्रवाशांची मोठी सोय होईलच, शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ होईल, असा विश्वास पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाला लवकरात लवकर ही थेट सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी नम्र विनंती कुणकेश्वर ग्रामपंचायत प्रशासक श्री . ताम्हणकर यांनी केली आहे. या मागणीमुळे आता दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.


