देवगड जामसंडे शहरातील सांडपाणी प्रश्नी नगरसेवक विशाल मांजरेकर आक्रमक
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास सांडपाण्यात बसून करणार जन आंदोलन
मुख्याधिकाऱ्यांना दिला इशारा
देवगड: प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रातील देवगड-निपाणी रोड, कॉलेज नाका ते एसटी स्टँड (हापूस होमच्या मागील बाजू, सात पायरी, मराठे हॉस्पिटल, तुळशी नगर) या परिसरात इमारतींमधील सांडपाणी बेकायदेशीरपणे पावसाळी गटारात सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरोधात उबाठा शिवसेना नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन तीव्र संताप व्यक्त केला आहे. येत्या आठ दिवसांत संबंधित इमारत मालकांवर कारवाई न झाल्यास थेट सांडपाण्यात बसून जन आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या परिसरातील इमारत मालक नगरपंचायतीची परवानगी नसताना सांडपाणी पावसाळी गटारात सोडत असल्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. हा प्रकार ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ च्या कलम २३० चे उल्लंघन करणारा आहे. इमारतीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी संबंधित इमारत मालकाची असूनही प्रशासन कारवाई करत नसल्याचे पत्रात म्हटले आहे.
या संदर्भात सभागृहात वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतर, मार्च महिन्याच्या मासिक सभेत प्रशासनाने संबंधित मालकांना नोटीस देऊन ३० दिवसांत सांडपाणी व्यवस्थापन न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे व इमारतीची ओसी रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटून गेले तरी फक्त नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, त्यानंतर थेट सांडपाण्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


