देवगड भूमी अभिलेख कार्यालयात होतोय भ्रष्टाचार
उपसभापती अमोल लोके यांचा गंभीर आरोप
देवगड पंचायत समिती मासिक सभा
देवगड : प्रतिनिधी
देवगड भूमी अभिलेख कार्यालयात खातेदारांनी मागणी करूनही जमिनीचा नकाशा मिळत नाही, मात्र एजंटांनी मागणी केल्यानंतर तातडीने नकाशा कार्यालयातून दिला जातो. या कार्यालयात भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा गंभीर आरोप पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांनी देवगड पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत केला. भूमी अभिलेख कार्यालयाच्या या कारभाराबाबत महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
माजी सदस्यांना जास्त उत्पन्न दाखवून घरकुल योजनेतून केले अपात्र
पंचायत समितीचे माजी सदस्य अरविंद भोगले यांचे उत्पन्न जास्त दाखवून त्यांना घरकुल योजनेतून अपात्र केले आहे, असा गंभीर आरोप सदस्य सदाशिव ओगले यांनी केला. तसेच हिंदळे येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका ग्रामस्थाचेही जास्त उत्पन्न दाखवून त्याला घरकुल योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने सर्वे करून लाभापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई प्रस्तावित करावी, अशी मागणी ओगले यांनी केली.
आंबा बागायतदार नुकसान भरपाई: तालुक्यातील कोणताही आंबा बागायतदार किंवा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये. तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती घ्यावी आणि प्रकरणे तयार करावीत, अशी सूचना सदाशिव ओगले यांनी केली.
शालेय साहित्याची विल्हेवाट: कोठकामते जि.प. शाळेसमोरील बसवण्यात आलेली खेळणी काढून त्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले आहे. याला मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापन समितीने विरोध केला नाही, याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
रस्ते सुरक्षा आणि विकास: मुणगे तिठा येथे गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत, तिथे गतिरोधक बसवावेत. तसेच देवगड हा डोंगराळ तालुका असल्याने साकव दुरुस्तीसाठी जादा निधी द्यावा आणि शाळांची दुरुस्ती १५ जूनपर्यंत पूर्ण करावी.
विद्युत विभाग: वीज वितरण कंपनीने जीर्ण आणि गंजलेल्या खांबांचे (Poles) सर्वेक्षण करून नवीन खांब बसवावेत, अशी सूचना सभापती गणेश राणे यांनी केली.
पाणी प्रश्न: तांबळडेग दक्षिणवाडा येथील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप व्यवस्था झालेली नाही. आश्वासन देऊनही काम न करणाऱ्या पाणीपुरवठा अधिकारी आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची सूचना उपसभापती अमोल लोके यांनी दिली.
ही मासिक सर्वसाधारण सभा सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील उपस्थित होते.


