ऑपरेशन क्लीन सी चा धडाका सुरूच!

Google search engine

ऑपरेशन क्लीन सी चा धडाका सुरूच!

LED मासेमारी करणारी देवगडची नौका जप्त

मच्छिमारांना मोठा दिलासा

 

देवगड / सिंधुदुर्ग

मत्स्यव्यवसाय विभागाने ‘*ऑपरेशन क्लीन सी*’ अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली असून, रात्री उशिरा विजयदुर्ग समोरच्या समुद्रात LED पद्धतीने अवैध मासेमारी करणारी एक नौका जप्त करण्यात आली. ही मोहीम जिल्ह्यातील छोट्या मच्छिमारांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

 

दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी देवगड परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वात नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई घडली. 

 

विजयदुर्ग समोर साधारण २० वाव (फॅदम) पाण्याच्या खोलीत, किनाऱ्यापासून 9 समुद्री मैल अंतरावर अमीना (AMINA) IND-MH-5-MM-647 या नोंदणीकृत नौकेद्वारे LED लाइट्सचा वापर करून मासेमारी सुरू होती. रात्री 1.00 च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने नौकेवर धाड घातली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. सदर नौका विजयदुर्ग बंदरात जप्त करून ठेवण्यात आलेली आहे.

 

 किरण वाघमारे यांनी देवगड सुरक्षा रक्षक बांधकर, खवले, टुकरुल, फाटक, नेसवनकर आणि सावजी यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली. या नौकेचे मालक व चालक देवगड येथील असल्याचे समजते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. सागर कुवेसकर यांनी ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविली आहे. समुद्रातील अवैध LED मासेमारी रोखण्यासाठी विभाग सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या यशस्वी कारवाईमुळे देवगड, विजयदुर्ग, मालवणसह संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमार समुदायात समाधानाचे वातावरण आहे. “अखेर सरकार आणि विभागाने आमच्या अडचणींकडे लक्ष दिले. LED मासेमारी करणाऱ्यांना आता धाबे दणाणले आहेत,” अशी भावना स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केली.