*जगातील सर्वोत्तम दहा युद्धांपैकी एक युद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले प्रतापगडचे युद्ध
देवगड,/ प्रशांत वाडेकर
शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय आणि श्रीम. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौन्सिल सभागृहात आज सकाळी ९.०० वाजता शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमापूजनाने प्रमुख पाहुणे मा. सुशील मणचेकर यांनी केली आणि महाराजांना अभिवादन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी प्रास्ताविकामध्ये शिवरायांच्या कार्याची महती सांगून शिवरायांचे शेतकऱ्याविषयीचे धोरण अशा त्यांच्या विविध कार्यकर्तृत्वाचा गौरव करून सभागृहात शिवमय व चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केले. त्यानंतर श्रीमती. न.शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पारस जाधव यांनी शिवरायांमध्ये राजमाता जिजाऊ यांनी ज्या चार नैतिक मूल्यांची रुजवण केली त्या न्याय, स्वातंत्र, समता आणि बंधुत्व यांची आजही भारतीय समाजाला आहे हे अधोरेखित केले.त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून सुशील मणचेकर यांनी रयतेचा राजा: छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मौलिक असे मार्गदर्शन केले.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन, कार्य, नेतृत्व आणि स्वराज्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. शिवरायांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि रयतेच्या राजा म्हणून असलेल्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत प्रबोधन केले. जगातील सर्व लष्करांमध्ये जगातील सर्वोत्तम म्हणल्या जाणाऱ्या दहा युद्धांचा अभ्यास शिकवला जातो. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या युद्धाचा समावेश आहे. त्यांनी वापरलेल्या युद्धनीतीचा जग अभ्यास करत आहे. अशावेळी आपणही त्यांचा वारसा जपला पाहिजे असे प्रतिपादन मा. मनचेकर सरांनी केले. रयतेमध्ये स्वाभिमान जागृत करून आपण सधन व संपन्न होऊ शकतो हे शेतीतून उत्पन्न घेऊन दाखवले.
मावळ्यांची फौज तयार करून संघटित होऊ शकतो व तोरणा जिंकल्यावर जिंकू शकतो आणि त्यातूनच स्वराज्य निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी रयते मध्ये निर्माण केला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि.बी. कुनुरे यांनी अध्यक्षीय समारोप करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी गौरवोद्गार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रल्हाद कांबळे यांनी केले. तर प्रा.सचिन दहीबावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यायातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


