कुणकेश्वर मध्ये भरणार भक्तीचा कुंभमेळा

0
Google search engine

 

महाशिवरात्री यात्रोत्सावासाठी कुणकेश्वर सज्ज

 

 

 

प्रशांत वाडेकर, क्षेत्र कुणकेश्वर

कपाळी चंद्रकोर, गळा सर्पाचा हार ॥ त्रिशूल धारी तो, डमरूचा झंकार ॥ भस्म लेपुनी अंगा, जो नीलकंठ सजला, भक्तांच्या हाकेला, तो धावूनिया आला ॥ शिवभक्त व भाविक ज्या दिवसाची, ज्या क्षणाची वर्षभर वाट पाहतात तो दिवस महाशिवरात्रीचा आज क्षण आला आहे. कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्रीच्या यात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. यावर्षी यात्रोत्सव तीन दिवसाचा असल्याने लाखो भाविकांची प्रचंड गर्दी कुणकेश्वर क्षेत्री होणार आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी अमृत स्नानाचा योग असून गावोगावच्या देवतांच्या पवित्र तीर्थस्नानाने या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यावर्षी १० लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दि. १५ रोजी रात्रौ. बारा वाजता श्रींच्या पूजाविधीला प्रारंभ होईल. तसेच शासकीय पूजा संपन्न झाल्यावर महाआरती होईल. त्यानंतर पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास भाविकांसाठी दर्शन खुले होईल.

सुलभ दर्शनाची सोय

भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी दर्शन मंडप व दर्शन रांगांची चोख व्यवस्था देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने करण्यात आली आहे. भक्तनिवास समोरील तीन मजली दर्शन मंडपातून दर्शनासाठी रांग सुरू होऊन त्यानंतर कुणकेश्वर मंदिर परिसरात ही रांग वळविण्यात आली आहे. श्रींच्या दर्शनासाठी मंदिराच्या उत्तर दरवाज्यातून भाविकांना प्रवेश दिला जाईल तसेच दक्षिण दरवाजा जवळ प्रसाद वाटप करण्यात येईल. भाविकांनी कृपया रांगेतूनच दर्शन घेऊन सहकार्य करावे. यात्रा परिसरात ठिकठिकाणी LED स्क्रीनद्वारे तसेच युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण यात्रेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

विद्युत रोषणाई व फुलांची आकर्षक सजावट

श्री देव कुणकेश्वराचा परिसर विद्युत रोषणाईने झळकला असून मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिरापासून चार किलोमीटरच्या परिघात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. महावितरण कडून सर्वत्र लाईटची व्यवस्था चोख केली असून. अखंडित विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण च्या वतीने नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून नियोजन करण्यात आले आहे.

चोख पार्किंग व्यवस्था

ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने ही भाविकांसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे कुणकेश्वरला येणारे सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात आले असून देवगड वरून येणाऱ्या वाहनांसाठी अस्मि रिसॉर्ट जवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कणकवली येथून येणाऱ्या वाहनांसाठी कुणकेश्वर घाटीच्या वरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मालवण मधून येणाऱ्या वाहनांसाठी समुद्रकिनारी एमटीडीसी नजीक पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आपली वाहने पार्किंग क्षेत्रातच पार्क करून भाविकांनी वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावयाची आहे.

यात्रेकरूंसाठी १०० बसेस

एसटी महामंडळाच्यावतीने कुणकेश्वर घाटीच्या वरती बस डेपो तसेच पावणाई देवी मंदिर येथे ही बस डेपोची उभारणी करण्यात आली आहे. ठिकठिकाणाहून एसटीच्या शंभर जादा गाड्या कुणकेश्वर यात्रेसाठी सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. पोलीस प्रशासनाच्या वतीने ही यात्रोत्सवासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वतोपरी बंदोबस्त करण्यात आला असून मंदिर परिसरात तसेच कुणकेश्वर प्राथमिक शाळा येथे पोलीस नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने गावात पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले असून भक्तनिवास कुणकेश्वर व प्राथमिक शाळा कुणकेश्वर येथे आरोग्य पथक तसेच यात्रा परिसरात रुग्णवाहिका सदैव तैनात असणार आहे. अग्निशमन चे तीन बंब ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यात्रेमध्ये असणार आहेत.

देवस्वाऱ्या हे यात्रोत्सवाचे विशेष आकर्षण

यावर्षी कुणकेश्वर यात्रोत्सवामध्ये कुणकेश्वराच्या भेटीसाठी चार देवस्वाऱ्या येणार आहे. त्यामध्ये श्री देव लिंगेश्वर पावणादेवी देवस्थान जानवली ता. कणकवली, श्री देव नागेश्वर पावणादेवी नागवे ता. कणकवली, श्री पावणाई रवळनाथ देवस्थान मालोंड बेलाचीवाडी ता. मालवण, श्री देव गांगेश्वर देवस्थान, नारीन्ग्रे देवगड या चार देवस्वाऱ्याचा समावेश आहे.

तीर्थक्षेत्री अमृतस्नान योग

दिनांक १७ रोजी कुणकेश्वर भेटीसाठी आलेल्या देवस्वारी येथील समुद्र तीर्थावर अमृतस्नान करण्यासाठी दाखल होतील भाविकांना या देवतांसोबत स्नान करण्याचे भाग्य लाभणार आहे. कोकणच्या या महाकुंभमेळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त उत्सुक असून लाखोच्या संख्येने शिवभक्त कुणकेश्वर क्षेत्री दाखल होत आहेत. भाविकांनी येथे हर हर महादेवच्या गजरात मोठ्या उत्साहात, थाटात येऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घ्यावे, श्रींचे कृपाशीर्वाद प्राप्त करावेत. व यात्रा यशस्वी करण्यासाठी देवस्थानला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन कुणकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.