देवगड तालुक्यातील मोकाट गोवंश समस्येवर शाश्वत उपाय : गोशाळा ही काळाची गरज

Google search engine

देवगड तालुक्यातील मोकाट गोवंश समस्येवर शाश्वत उपाय 

गोशाळा ही काळाची गरज

– डॉ. माधव घोगरे ____________
सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन तथा तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, देवगड

देवगड तालुका हा कृषीप्रधान आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्या मुळे वैभव संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत मोकाट गोवंशाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ते, राज्य महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गांवर दिवसा आणि विशेषतः रात्रीच्या वेळी गुरे बसलेली किंवा मुक्तपणे फिरताना आढळतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात आणि दुर्दैवाने गंभीर अपघात घडत आहेत. अलीकडेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या गुरांना दुचाकी आदळल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. अशा घटना केवळ अपघात नसून समाजासाठी गंभीर इशारा आहेत.

ही समस्या केवळ वाहतुकीपुरती मर्यादित नाही. मोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकरी रात्रभर पिकांच्या राखणीत वेळ घालवतो. एवढेच नव्हे तर आज शेन खाता ऐवजी भरमसाठ रासायनिक खते, कल्टlर व फवारणीच्या अती वापरामुळे देवगड तालुक्याचं वैभव असलेला हापूस आंबा धोक्यात आहे , आणि हा संभाव्य धोका जर टाळायचा असेल तर आज काळाची गरज आहे शेणखत,गांडुळ खत,गोमूत्र आणि सेंद्रिय खत यांचा वापर वाढविणे तरच आजच्या या बदलत्या वातावरणात आपल्या कलम बागेचे आरोग्य सहदृढ राखून शाश्वत उत्पन्न मिळवून आपण आपले वैभव परत मिळवू शकू तर दृष्टीने ग्रामपंचायती, पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यासमोरही ही एक मोठी प्रशासकीय आणि सामाजिक समस्या बनली आहे.

या प्रश्नावर तात्पुरते आणि त्वरित उपाय करता येतील या मध्ये मोकाट गुरांचा शिंगणा व गळ्यात रेडियम पट्टे प्राधान्याने लावणे म्हणजे रात्री च्या वेळी अपघात टाळता येतील ; परंतु कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय म्हणून ग्रामपंचायत स्तरावर गोशाळा स्थापन करणे हा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो.

महाराष्ट्र शासनाने गोवंश संरक्षण आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन केला आहे. आयोगाच्या माध्यमातून नोंदणीकृत गोशाळा, गोसदन आणि पांजरपोळ संस्थांना मार्गदर्शन, नोंदणी आणि नियमनाची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे देवगड तालुक्यातील इच्छुक ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने गोशाळा उभारण्याचा विचार करणे आवश्यक आहे.

गोशाळा म्हणजे केवळ निराधार व मोकाट गोवंशासाठी आश्रयस्थान नव्हे.तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक उत्पादन केंद्र बनू शकते. गोशाळेतून मिळणाऱ्या शेणापासून उच्च प्रतीचे सेंद्रिय खत, वर्मी कम्पोस्ट (गांडूळ खत), जैविक इनपुट्स, तसेच बायोगॅस निर्मिती करता येते. वाढत्या सेंद्रिय शेतीच्या पार्श्वभूमीवर या उत्पादनांना मोठी मागणी निर्माण होत आहे. त्यामुळे गोशाळा खर्चिक प्रकल्प न राहता टप्प्याटप्प्याने स्वयंपूर्णतेकडे जाऊ शकते.

यासोबतच गोमूत्रावर आधारित जैविक उत्पादने, शेणापासून तयार होणारी पर्यावरणपूरक उत्पादने, सेंद्रिय खत विक्री आणि स्थानिक कृषी गटांशी समन्वय यामुळे गोशाळेला नियमित उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. गोपालक, चारा व्यवस्थापन, वर्मी कम्पोस्ट उत्पादन, खत पॅकिंग, बायोगॅस व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत स्थानिक रोजगार वाढू शकतो.

देवगड सारख्या तालुक्यात अनेक ग्रामपंचायती एकत्र येऊन क्लस्टर पद्धतीने सामायिक गोशाळा उभारण्याचाही विचार करता येईल. प्रत्येक गावात स्वतंत्र गोशाळा उभारणे शक्य नसल्यास दोन-तीन गावांसाठी एक सक्षम गोशाळा विकसित करणे हा व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. अशा पद्धतीमुळे खर्च कमी होईल आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल.

या उपक्रमात नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. इच्छुक संस्थांना मार्गदर्शन करून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करता येतील. स्थानिक लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी आणि देणगीदारांचा सहभागही या उपक्रमाला बळ देऊ शकतो.

आजची गरज केवळ मोकाट गुरांना पकडण्याची नाही; तर त्यांचे सुरक्षित पुनर्वसन, वैज्ञानिक संगोपन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याची आहे. गोशाळा ही या तिन्ही उद्दिष्टांना एकाच वेळी साध्य करणारी प्रभावी संकल्पना आहे. यामुळे रस्ते अधिक सुरक्षित होतील, शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल, गोवंशाचे संरक्षण होईल, सेंद्रिय शेतीला चालना मिळेल, ग्रामीण रोजगार वाढेल आणि पर्यावरणपूरक ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित होईल.

देवगड तालुक्यात आज ही संकल्पना राबविण्याची योग्य वेळ आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी,नगरपंचायत, ग्रामपंचायती आणि समाज यांचा संयुक्त सहभाग असेल, तर मोकाट गोवंशाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. “गोवंश संवर्धन संरक्षणातून ग्रामविकास आणि ग्रामविकासातून शाश्वत अर्थव्यवस्था” हा विचार प्रत्यक्षात आणण्याची हीच खरी आज काळाची गरज आहे.
हिंदू पुराणिक कथे नुसार समुद्र मंथन या मधून 14 रत्नापैकी दुसऱ्या नंबर चे रत्न म्हणजे कामधेनू जिच्या शेण गोमूत्र यांचा शास्त्रीय उपयोग करून आज विष युक्त झालेले शेती आपण विषमुक्त (Organic farming)करू शकतो,आज ही अत्यंत्य उपयुक्त कामधेनू आपण रस्त्यावर सोडून दिली आहे,म्हणुन आज असा प्रश्न निर्माण होतो की खरोखरच आपण आजच्या या इंटरनेट या युगात प्रगती कडे जातोय की अधोगती कडे कारण आज विषाक्त शेती मुळे डायरेक्ट लोकांच्या आरोग्यावर खूपच विपरीत परिणाम होतो आहे आज लोकांमध्ये कॅन्सर चे प्रमाण वाढते आहे हाही एक निसर्गाकडून आपल्या सर्वांसाठी एक गंभीर इशाराच आहे आज बाजारात उपलब्ध असलेला भाजीपाला किंवा कोणतेही फळे घ्या हे विषयुक्त च आहेत कारण खालून जमिनीतून रासायनिक खते आणि वरून फवारणी आणि हे सर्व टाळायचे असेल आज काळाची गरज आहे ग्रामपंचायत तिथे गोशाळा ही संकल्पना मिशन मोडवर राबविण्याची आणि ऑरगॅनिक शेतीकडे वाटचाल करण्याची.