देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार
उपजिल्हाप्रमुख यदुनाथ ठाकूरदेसाईंसह प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
देवगड / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख यदुनाथ ठाकूरदेसाई आणि त्यांचे प्रमुख सहकारी केवल ठाकूरदेसाई यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) जाहीर प्रवेश केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. पालकमंत्री राणे यांनी यदुनाथ ठाकूरदेसाई आणि केवल ठाकूरदेसाई यांचे भाजपचा स्कार्फ घालून पक्षात अधिकृत स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ठाकूरदेसाई यांच्या भाजप प्रवेशामुळे देवगड तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढणार असून, ठाकरे गटाला मात्र स्थानिक पातळीवर मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.
या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी भाजप देवगड तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, प्रकाश गोगटे, भूषण पोकळे, अंकुश ठूकरूल, विनोद सुके, संदीप पुजारे, सुहास वाडेकर, शशांक तावडे, समीर तानवडे, शेखर सुतार, संजय तावडे यांच्यासह पक्षाचे इतर आजी-माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यदुनाथ ठाकूरदेसाई यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि सक्रिय नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे देवगड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


