पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यापेक्षा साळसकर यांनी आत्मपरीक्षण करावे!

Google search engine

पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यापेक्षा साळसकर यांनी आत्मपरीक्षण करावे!

भाजप पडेल मंडळ अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांचा विलास साळसकर यांना सडेतोड टोला

माहिती अधिकार’ आणि ‘बाहेरील उमेदवार’ ठरले पराभवाचे मुख्य कारण

 

देवगड | प्रतिनिधी

मणचे पंचायत समिती मतदारसंघातील पराभवासाठी भाजप आणि पालकमंत्री नितेश राणे यांना जबाबदार धरण्याऐवजी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. साळसकर यांचा पराभव हा कोणत्याही राजकीय कटकारस्थानामुळे नव्हे, तर त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीमुळे आणि स्थानिक जनतेच्या निर्णयामुळे झाला असून त्यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत, असा जोरदार पलटवार भाजप पडेल मंडळ अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी केला आहे.

​विलास साळसकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन मणचे पंचायत समिती निवडणुकीतील आपल्या पराभवासाठी भाजप आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांचा समाचार घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बंड्या नारकर बोलत होते.

​’बाहेरील उमेदवार’ मतदारांनी नाकारला!

​नारकर म्हणाले की, मणचे पंचायत समिती मतदारसंघातील वास्तव परिस्थिती जनतेला चांगली माहिती आहे. या मतदारसंघात साळसकर यांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे ते स्थानिक मतदार नसून शिरगाव-साळशी गावचे रहिवासी आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनतेसमोर स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरील उमेदवार असा प्रश्न निर्माण झाला होता. मतदारांनी स्थानिक प्रश्न आणि स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देत विष्णू घाडी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. हा जनतेच्या लोकशाही निर्णयाचा परिणाम असताना त्यासाठी इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे.

​भाजपने पाळला महायुती धर्म

​”महायुती धर्म पाळत भाजपने मणचे पंचायत समिती मतदारसंघाची जागा शिवसेना (शिंदे गट) यांना दिली होती. या मतदारसंघात भाजपकडे माजी पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते फरीद काझी, अमोल तेली, बाबा अमलोस्कर यांच्यासारखे सक्षम व तगडे इच्छुक उमेदवार असतानाही महायुतीसाठी भाजपने स्वतःचा दावा मागे घेतला. पालकमंत्री नितेश राणे यांनी साळसकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने गावोगावी जाऊन मेहनत घेतली. असे असतानाही पराभवाचे खापर भाजपवर फोडणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे.”
– महेश उर्फ बंड्या नारकर (अध्यक्ष, भाजप पडेल मंडळ)

​माहिती अधिकाराचा गैरवापर अन् सरपंचांना त्रास!

​साळसकर यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नारकर म्हणाले की, निवडणुकीच्या काळात आणि त्यापूर्वी अनेक ग्रामपंचायतींतील सरपंच आणि लोकप्रतिनिधींविरोधात माहिती अधिकाराचा (RTI) वापर करून वारंवार माहिती मागविण्याचे प्रकार झाले. अनेक सरपंचांना विनाकारण त्रास देण्याचे काम करण्यात आले. विकासकामांपेक्षा वैयक्तिक वाद आणि आरोप-प्रत्यारोपांनाच अधिक महत्त्व दिले गेल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती, ज्याचा फटका साळसकर यांना बसला.

​राजकीय नैराश्यातून आरोप

​पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरील आरोपांचा निषेध करत नारकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी राणे सातत्याने प्रयत्नशील असून महायुतीतील सर्व घटकांना सोबत घेऊन चालतात. साळसकर यांचे आरोप तथ्यहीन आणि राजकीय नैराश्यातून आलेले आहेत. निवडणुकीतील पराभव स्वीकारण्याची राजकीय परिपक्वता प्रत्येक नेत्याने दाखवली पाहिजे, असे सांगत हा विजय जनतेचा आणि स्थानिक नेतृत्वाचा असल्याचा पुनरुच्चार नारकर यांनी केला.