फणसे समुद्रात खलाशीचा मृतदेह सापडला

Google search engine

फणसे समुद्रात खलाशीचा मृतदेह सापडला

देवगड तालुक्यातील सुरज आचरेकर बेपत्ता प्रकरणाचा दुर्दैवी शेवट

 

देवगड : प्रतिनिधी 

फणसे येथील समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या मच्छिमारी नौकेवरील खलाशी बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह अखेर सापडला आहे. मोंड झरकरवाडी येथील सुरज सूर्यकांत आचरेकर (वय 30) याचा मृतदेह रविवारी सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या समुद्रात आढळून आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील ‘बन्सी’ नावाच्या मच्छिमारी नौकेवर सुरज आचरेकर हा खलाशी म्हणून कार्यरत होता. 1 मे रोजी रात्री 12 ते पहाटे 5 या कालावधीत फणसे समुद्रात ही नौका नांगर टाकून उभी असताना तो अचानक बेपत्ता झाला.

घटनेनंतर त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नव्हता. त्यामुळे हितेश संजय हरम (वय 26, रा. देवगड किल्ला) यांनी देवगड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी सकाळी त्याचा मृतदेह समुद्रात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत.